नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावा ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

बुलढाणा, दि. 20 (जिमाका): चिखली तहसील कार्यालय येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाने प्राप्त झालेल्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करुन सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावेत. कामात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिला. जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात 110 हून अधिक निवेदने प्राप्त झाली. महसूलमंत्र्यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी व अडचणी जाणून घेतल्या. प्राप्त निवेदनांवर निर्णय घेण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयातच विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी आमदार स्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, अजिंक्य घोडके, सुरेश थोरात, उपविभागीय अधिकारी शरद पाटील तसेच तहसीलदार व विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. महसूलमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंडळस्तरावर ‘छत्रपती महाराजस्व शिबीर’ राबविण्यात येत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन काम करावे. कामकाजात हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित आढावा घ्यावा. कोणीही पात्र लाभार्थी शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये, ही शासनाची प्राथमिकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

या जनसंवाद कार्यक्रमात मालकी पट्टे, रस्ते, वाळू, कृषी, शेतकरी आत्महत्या, घरकुल, पाणी, क्रीडा, आरोग्य, बांधकाम आदी विषयांवरील निवेदने मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाली. अनेक नागरिक वैयक्तिक समस्या घेऊन उपस्थित होते. सर्व निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *